Monday, November 26, 2007

थंडीचं प्रेझेंटेशन

आवारेमध्ये चिकन थाळी हादडून मी हात धूतच होतो. तेवढ्यात, मोबाइलवर जोश्‍या!
"हां, बोला साहेब.''
''हॅलो, मी कास्पियन समुद्रावरच्या एका बेटावरून बोलतोय.''
"तुम्ही कास्पियनमधून बोला किंवा आल्पसमधून, आता पुढे काय करायचंय ते सांगा. आम्ही आवारेतून संपवून निघालोय.''
"काय मटण का?''
"ए, कुठे यायचं सांग?''
"पोर्टीकोवर''
"ओ. के. सर, पाच मिनिटांतच येतो. पण काम काये, ऑफिसमधल्या कुठल्या मुलीचं वगैरे!''
"ए. महाभारतातल्या संजया, स्वतःला तू कितीही व्हिसॅट वगैरे समजत असला, तरी या वेळचं प्रकरण वेगळं आहे.''
"वेगळं म्हणजे या वेळी कुणी परदेशी पोरगी....''
"प्रकरण ऑफिसमधलंच आहे, पण फॉर यूवर काइंड इन्फॉरर्मेशन... पोरीचं नाही.''
फोन संपवून मी पोर्टिकोवर पोचलो, तर जोश्‍या अगोदरच हजर.
"काय घेणार? दोन छोट्या की एक मोठी? पान लगेच घेणार का, नंतर?''
"फारच मेहेरबान झालाय! काम फारच तगडं दिसतंय!''
"ए छोटूऽऽ दोन मघई दे एक बिगर डीप. तगडं-बिगडं काही नाही रे! पण थोडं महत्त्वाचं आहे.''

झेड ब्रिजकडे सरकता सरकता जोश्‍या हळूहळू खुलू लागला.
"अरे मला कंपनीमध्ये एक प्रेझेंटेशन द्यायचंय!''पुरेशा गंभीरपणे मी म्हणालो, "
"हल्ली प्रेझेंटेशन फारच वाढलीयेत रे!''
माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत तो म्हणाला, "थंडीवर, गुलाबी थंडीवर प्रेझेंटेशन द्यायचंय. इंडिव्हिज्युअली प्रेझेंटेशन द्यायचंय.''
मी, "बरं.''
तो, "बरं काय! थंडीवर काय प्रेझेंटेशन देणार यार? आणि आमच्या सॉफ्टवेअर प्रॉडक्‍टचा आणि थंडीचा संबंध काय. आमचे बॉस चार एसीतल्या थंडीत बसून बसून डोक्‍यानेही असेच थंड झालेत. थंडीवर प्रेझेंटेशन द्या म्हणे?''
"अरे प्रेझेंटेशन थंडीवरच काय, जगातल्या कोणत्याही गोष्टींवर देता येतं.''
""अरे पण त्याचा आमच्या प्रॉडक्‍टशी संबंध काय?''
वरवर गंभीरपणे मी म्हणालो, "तसा कोणत्याच गोष्टीचा कोणत्याच गोष्टीशी संबंध नसतो आणि तसा प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीशी संबंध असतो.''
"म्हणजे काय?''
"तू कधी विधानसभेतली भाषणं ऐकली?''
"आम्ही वेडे आहोत पण इथके नक्कीच नाही हं! अरे पण थंडीचा आणि विधानसभेचा संबंध काय?''
"अरे थंडीचा आणि जगामधल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आहे. म्हणजे हिवाळी अधिवेशन, त्यातल्या पार्ट्या वगैरे... वगैरे... असो! विधानसभेचा संदर्भ थंडीसाठी नाही. ओढूनताणून आणल्या जाणाऱ्या संदर्भाबद्दल होता.''"
"पण थंडीचं काय आणि आम्हाला त्याच्यावर प्रेझेंटेशन म्हणजे...''"
"अरे बाबा ब्रेन स्टॉर्मिंग, स्किल्स, सर्व बाजूंनी तुम्ही विचार किती करता..., अरे आता तीच सीडी किती वेळा किती जणांनी रिपीट केलीये यार!''
""ओके, ओके मी समजलो. पण आता थंडीवर प्रेझेंटेशन काय देणार?''
""हे बघ, ते एलसीडी किंवा असं कर ना सरळ मोबाइलमधून व्हिडिओशूटच घे ना!''"
"अरे, पण सब्जेक्‍टचं काय?''"
"असं कर, गुलाबी थंडीत तुझा बॉस आणि तुझी कलिग दोन दिवस अचानक गायब...., हा विषय घे.''"
"किंवा असं कर, थंडी आणि पर्यावरण घे. एकदम हिट टॉपिक, काय?''
""खूप अवघड आहे रे!''"
"मग गेल्या दहा वर्षांत कमी जास्त होणारे थंडीचे आकडे, महिने वगैरे, यांचा एक स्टॅटिस्टिकल डेटाच प्रेझेंट कर ना!''"
"खूपच काम करावं लागेल रे!''"
"थंडीत रस्त्यावर राहणारे लोक, त्यांची फुगे विकणारी मुलं. कारच्या हीटरमधून स्वेटर, जॅकेटसह बाहेर पडणारे लोक, आपला गिल्ट! हा हा, हाच विषय घे तू.''

आम्ही दोघंही असंच बोलत बोलत झेड ब्रिजवरून परत पोर्टिकोवर येतो.
आपापल्या गाड्या घेऊन आपापल्या घरी जातो.

No comments: