Tuesday, January 1, 2008

हॅपी न्यू इयर

पियू, अथर्व, गंधाली आणि आर्यन हा नॉक आऊट ग्रुप. त्यांची कॉलेजपासूनची दोस्ती. आता नुकतेच कुठे ते जॉबला लागले होते.
या वर्षी थर्टी फर्स्ट जरा हटके करायचं त्यांनी ठरवलं होतं. "हटके म्हणजे काय?', असा खवचट प्रश्‍न मध्येच गंधालीनं विचारलाच होता. तेव्हा सर्वानुमते थर्टी फर्स्ट हा "इको फ्रेंडली' करायचा ठरला. "इको फ्रेंडली' म्हणजे काय, असाही प्रश्‍न पुन्हा आलाच!
घरापासून दूर नेहमीसारखंच एखाद्या शेतात जाऊन पार्टी करायची. पार्टी करताना कोणाला त्रास होणार नाही, असं बघायचं. कचरा, गोंधळ, बाटल्या आपल्या आपण उचलून न्यायच्या, ही त्यांची "इको फ्रेंडली'ची कल्पना.
इको फ्रेंडली कशाला, कुठल्यातरी हॉटेलात जाऊ. डिजे-बिजेबरोबर मस्त गाऊ नाचू, असं अथर्वचं म्हणणं. पण आर्यन म्हणाला, ""आपण आणि सगळे दर वर्षी तेच करतात. या वेळी काही तरी वेगळं करू.'' त्याला पियूनं पाठिंबा दिला.
मित्र, कॉलनीतले मित्र आणि मित्रांच्या मित्रांना इन्व्हीटेशन्स गेली. गंधालीच्या ओळखीच्या काकांच्या फार्म हाऊसवर संध्याकाळी सगळी गॅंग पोचली. सेटबिट लावल्यानंतर म्युझिक सुरू झालं. हे स्टार्टर झाल्यानंतर अंताक्षरी, ऍक्‍टिंगची हूनर वगैरे झाल्यानंतर मग झूम बराबर झूमच्या तालात काऊंट डाऊन झाला. आणि सगळ्यांनी सगळ्यांना हॅपी न्यू इयर केलं.
लगेच सगळ्यांनी एकमेकांना नव्या वर्षातील आपले संकल्प सांगायचं ठरलं. कोणी म्हणालं, की मी या वर्षी ऑर्कुटला रामराम करणार. कोणी म्हणालं, की मी नवा जॉब शोधणार. गंधाली म्हणाली, ""मी या वर्षी सिरीयस व्हायचं ठरवलंय.'' अथर्व म्हणाला, ""मी इंग्लीशवर भर देणार,'' पियू म्हणाली, ""मी या वर्षी रिलेशनशिपचा सिरियसली शोध घेणार आहे.'' आर्यन म्हणाला, ""मी सोशल वर्क करायचं ठरवलंय.
''प्रत्येकानं प्रत्येकाला त्याच्या रिझोल्यूशनमध्ये मदत करायची ठरवली. आर्यनची सोशल वर्कची कल्पना नेमकी काय, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. तो म्हणाला, ""त्यासाठी आपण एक महिन्याने भेटू, टिल देन हॅपी न्यू इयर.''

Tuesday, December 18, 2007

हे आणि तेही

बऱ्याच दिवसांनी संध्याकाळी आम्ही युनिव्हर्सिटीत अड्डा जमवायचं ठरवलं.
पश्‍या, मी आणि जोश्‍या. थंडी, चहा आणि गप्पा. व्वा क्‍या बात है!
जोश्‍या फोनवर जोशात होता. ""मला फारच महत्त्वाचं बोलायचंय. डॉट वेळेवर या.''
अपेक्षेप्रमाणे मी आणि जोश्‍या वेळेवर हजर. पश्‍याची गाडी दिसत होती; पण पश्‍या गायब. थोड्या वेळानं स्वारी भकाभक फुकत निवांतपणे टपकली.
जोश्‍या म्हणाला, ""मला समजत नाही यार, काय करू? मला चित्रा पण आवडते आणि अश्‍विनी पण चांगली वाटते.''
मी- त्या दोघींपैकी जास्त कोणती आवडते?
जोश्‍या- टिपिकल प्रश्‍न विचारू नको.
मी- मग विचारून टाक, जिथं जमेल तिथं जमेल.
जोश्‍या - म्हणजे काय. ते इतकं सोप्पंय का! आणि तुम्ही या गोष्टी इतक्‍या कॅज्युअली नका घेऊ, बरं का!मी सिरीयसली बोलतोय. मला समजत नाहीये.
मी - अजून काही प्रश्‍न आहेत का, तुलना करण्यासाठी!
जोश्‍या - नाहीरे जाती-बितीचा प्रश्‍न नाही. प्रश्‍न अश्‍विनीसारख्या प्रचंड बुद्धिमान मुलीनं माझ्याबरोबर का यावं, हा आहे.
इतका वेळ शांतपणे फुकणारा पश्‍या उसळी मारून म्हणाला, ""माझं काही ऐकूनच घेणार आहात का?''"
"हा बोल'' ""बोल बोल.''
पश्‍या - हे बघा, माझ्या होणाऱ्या बायकोनं मंगळसूत्र घातलंच पाहिजे. माझं नाव लावलं पाहिजे. आणि ती माझ्या जातीचीच पाहिजे.
जोश्‍या - आणि अजून काय काय केलं पाहिजे? कुंकू, घुंगट वगैरे..वगैरे?
पश्‍याच्या बोलण्यावर जोश्‍या चांगलाच उखडला होता.
मी थोडी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला.
पश्‍या - नाही मी म्हणतो की माझ्या म्हणण्यात काय चूक काय आहे? मी असं बोललो की लोक खवळतात.
मी - नाही चूक काहीच नाही. फक्त प्रश्‍न असा आहे, की तुला अशी कोणी मिळालीय का? आणि तुला खरं सांगू, मला आता त्या जुन्या आशा काळे चित्रपटांची आठवण येतीये.
जोश्‍या - आणि एक कर तिला आमचीही ओळख करून दे. काय राव, आम्ही काय बोलतो आणि तू काय बोलतो!
दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी मी पुन्हा चहा मागवला आणि चर्चेचा विषय हळूच बदलला.

Monday, November 26, 2007

थंडीचं प्रेझेंटेशन

आवारेमध्ये चिकन थाळी हादडून मी हात धूतच होतो. तेवढ्यात, मोबाइलवर जोश्‍या!
"हां, बोला साहेब.''
''हॅलो, मी कास्पियन समुद्रावरच्या एका बेटावरून बोलतोय.''
"तुम्ही कास्पियनमधून बोला किंवा आल्पसमधून, आता पुढे काय करायचंय ते सांगा. आम्ही आवारेतून संपवून निघालोय.''
"काय मटण का?''
"ए, कुठे यायचं सांग?''
"पोर्टीकोवर''
"ओ. के. सर, पाच मिनिटांतच येतो. पण काम काये, ऑफिसमधल्या कुठल्या मुलीचं वगैरे!''
"ए. महाभारतातल्या संजया, स्वतःला तू कितीही व्हिसॅट वगैरे समजत असला, तरी या वेळचं प्रकरण वेगळं आहे.''
"वेगळं म्हणजे या वेळी कुणी परदेशी पोरगी....''
"प्रकरण ऑफिसमधलंच आहे, पण फॉर यूवर काइंड इन्फॉरर्मेशन... पोरीचं नाही.''
फोन संपवून मी पोर्टिकोवर पोचलो, तर जोश्‍या अगोदरच हजर.
"काय घेणार? दोन छोट्या की एक मोठी? पान लगेच घेणार का, नंतर?''
"फारच मेहेरबान झालाय! काम फारच तगडं दिसतंय!''
"ए छोटूऽऽ दोन मघई दे एक बिगर डीप. तगडं-बिगडं काही नाही रे! पण थोडं महत्त्वाचं आहे.''

झेड ब्रिजकडे सरकता सरकता जोश्‍या हळूहळू खुलू लागला.
"अरे मला कंपनीमध्ये एक प्रेझेंटेशन द्यायचंय!''पुरेशा गंभीरपणे मी म्हणालो, "
"हल्ली प्रेझेंटेशन फारच वाढलीयेत रे!''
माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत तो म्हणाला, "थंडीवर, गुलाबी थंडीवर प्रेझेंटेशन द्यायचंय. इंडिव्हिज्युअली प्रेझेंटेशन द्यायचंय.''
मी, "बरं.''
तो, "बरं काय! थंडीवर काय प्रेझेंटेशन देणार यार? आणि आमच्या सॉफ्टवेअर प्रॉडक्‍टचा आणि थंडीचा संबंध काय. आमचे बॉस चार एसीतल्या थंडीत बसून बसून डोक्‍यानेही असेच थंड झालेत. थंडीवर प्रेझेंटेशन द्या म्हणे?''
"अरे प्रेझेंटेशन थंडीवरच काय, जगातल्या कोणत्याही गोष्टींवर देता येतं.''
""अरे पण त्याचा आमच्या प्रॉडक्‍टशी संबंध काय?''
वरवर गंभीरपणे मी म्हणालो, "तसा कोणत्याच गोष्टीचा कोणत्याच गोष्टीशी संबंध नसतो आणि तसा प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीशी संबंध असतो.''
"म्हणजे काय?''
"तू कधी विधानसभेतली भाषणं ऐकली?''
"आम्ही वेडे आहोत पण इथके नक्कीच नाही हं! अरे पण थंडीचा आणि विधानसभेचा संबंध काय?''
"अरे थंडीचा आणि जगामधल्या प्रत्येक गोष्टीचा संबंध आहे. म्हणजे हिवाळी अधिवेशन, त्यातल्या पार्ट्या वगैरे... वगैरे... असो! विधानसभेचा संदर्भ थंडीसाठी नाही. ओढूनताणून आणल्या जाणाऱ्या संदर्भाबद्दल होता.''"
"पण थंडीचं काय आणि आम्हाला त्याच्यावर प्रेझेंटेशन म्हणजे...''"
"अरे बाबा ब्रेन स्टॉर्मिंग, स्किल्स, सर्व बाजूंनी तुम्ही विचार किती करता..., अरे आता तीच सीडी किती वेळा किती जणांनी रिपीट केलीये यार!''
""ओके, ओके मी समजलो. पण आता थंडीवर प्रेझेंटेशन काय देणार?''
""हे बघ, ते एलसीडी किंवा असं कर ना सरळ मोबाइलमधून व्हिडिओशूटच घे ना!''"
"अरे, पण सब्जेक्‍टचं काय?''"
"असं कर, गुलाबी थंडीत तुझा बॉस आणि तुझी कलिग दोन दिवस अचानक गायब...., हा विषय घे.''"
"किंवा असं कर, थंडी आणि पर्यावरण घे. एकदम हिट टॉपिक, काय?''
""खूप अवघड आहे रे!''"
"मग गेल्या दहा वर्षांत कमी जास्त होणारे थंडीचे आकडे, महिने वगैरे, यांचा एक स्टॅटिस्टिकल डेटाच प्रेझेंट कर ना!''"
"खूपच काम करावं लागेल रे!''"
"थंडीत रस्त्यावर राहणारे लोक, त्यांची फुगे विकणारी मुलं. कारच्या हीटरमधून स्वेटर, जॅकेटसह बाहेर पडणारे लोक, आपला गिल्ट! हा हा, हाच विषय घे तू.''

आम्ही दोघंही असंच बोलत बोलत झेड ब्रिजवरून परत पोर्टिकोवर येतो.
आपापल्या गाड्या घेऊन आपापल्या घरी जातो.

Monday, November 19, 2007

प्रिय जॉन


पत्रास कारण, की तुझी तब्येत!
म्हणजे तुझ्या तब्येतीला बघून बऱ्याच दिवसांपासून तुला पत्र लिहायचा विचार करीत होतो.
अरे तू कसा आहेस, वगैरे विचारायचं राहीलंच की! असो, तुला वाटेल की तब्येतीचा बहाणा करून मी बिप्सबद्दल काही माहिती विचारण्याचा प्रयत्न करतोय. नाही अजिबात नाही; पण बिप्सला प्राईज मिळाल्यामुळे तू खूष असशील नाही का? का जेलस झालाय? जाऊ दे रे!
तर, मला तुझ्या तब्येतीचा म्हणजे तुझ्या बॉडी बिल्डिंगचा आदर्श घ्यायचाय. काय म्हणतो पोरी-
छोरींसाठी! छे छे! पोरींसाठी नाही. मला स्वतःलाच जरा बॉडी कमवावी वाटतेय; पण, ऊफ! कमबख्त ही झोप मला काही करूच देत नाही रे! अरे म्हणजे कसं आहे, बघ! रात्री मित्रांबरोबर थोड्यावेळ म्हणजे बारा-एकपर्यंत गप्पा होतात. आणि मग मी घरी येऊन झोपतो. लवकर झोपच लागत नाहीरे! म्हणजे झोप लागते की नाही, तेच कळत नाही यार! म्हणजे मध्ये मध्ये अशी छान छान स्वप्नं पडतात. मधून मधून ऑफिसमधलं काही काही आठवतं. मध्येच ऑफिसमधलं एखादं काम राहिल्याचं आठवतं आणि झोपच ऊडते रे!
यू नो सध्या थंडीपण काय मस्त पडते यार! मग सकाळी म्हणजे नऊ दहाला, कधी कधी जरा लवकर म्हणजे साडेआठला उठतो.वॉक, जीम, जॉगिंग सगळं करायचंय यार! असं म्हणतात, की थंडीत व्यायाम वगैरे केला, की चांगला असतो म्हणे!
यार, काही तरी सांगना! कसं जमवायचं? काही तरी टीप्स दे यार!


तुझाच

Wednesday, November 14, 2007

स्टार क्‍लब

दिवाळीनंतर लगेच आशुतोष, श्रीकांत पियूष आणि सलिलाने एफसी रोडवर वाडेश्‍वरमध्ये अड्डा जमवला.

""सलिल तुला सांगू का, माझीयेना बऱ्याच दिवसांपासूनची एक इच्छा आहे. आपण सगळ्यांनी

वाडेश्‍वरमध्ये दर रविवारी सकाळी सातलाच भेटायचं; चहा घ्यायचा आणि टेकडीवर जायचं. आणि परतल्यावर आप्पे आणि इडली खायची.''"

"ए, आशा सकाळी सातला कोण येणार यार! आम्ही आपले जागून जागून कार्यक्रम बघतो.''"

"श्रीकांत, तुला सांगतो, ती बो डेरेक परत आलीये यार फॅशन हाऊसमधून.''"

"या. आय नो! तुला माहितीये का- या वेळी एफएचमध्ये निकी आणि टिनीची स्टोरी दाखवली.''"

"टिनी नाही रे! टायनी.''"

"हा, तेच ते रे! त्यांचे आणि आपले ऍक्‍सेंट वेगळे असतात.''"

"पियूष, तू "द क्‍लोजर' बघतो का रे?''"

"क्‍लोजर काय घेऊन बसलात यार, डेस्परेट हाऊस वाईफ बघा ना! बॉस!"

"ए आम्हाला नको सांगू! आम्ही कुठेही काही, म्हणजे आम्हाला पाहिजे ते शोधतो बरं का!''"

"गुरू, आम्ही अग्ली बेट्टीमध्येसुद्धा सलमा हायेकला शोधून काढलं, काय!''"

"ए ए अभय, अरे मिस युनिव्हर्स दाखवणारेत.''"

"मिस युनिव्हर्स नाही रे, मिस वर्ल्ड.''"

"तेच रे ते, आपल्याला काय फरक पडतो- युनिव्हर्स असो नाही तर वर्ल्ड! नुसतं बघायचं!''"

"तुम्ही आम्हाला नका बोलू. तुम्ही काय बघता? ब्रदर्स ऍन्ड सिस्टर्स की घोस्ट विस्फरिंग?''"

"हाऽऽ हाऽऽ हाऽऽ''"

"नाही आम्ही बघतो बियॉंड द ब्रेक. आम्ही काय वेडे आहोत का?''"

"आणि तुम्ही काय सास-बहू बघता का?''"

"नाही आम्ही बी ऍन्ड बीचे फॅन आहोत? आमच्या पूर्वजांपासून!''

"हाऽऽ हाऽऽ हाऽऽ''"

------------------------------------------------------------------------------------------

Monday, November 5, 2007

पक्‍या आणि मॅकी

पंकजकुमार, पोरांचा पक्‍या आणि तिचा पकू. हा हा सॉरी पऽऽऽकू! पक्‍या दररोज कायम जीन आणि टी शर्टमध्येच असतो. तो कुठल्याशा कोर्समध्ये विद्यापीठात एमए करतोय. त्याला तिथं ऍडमिशन कशी मिळाली माहीत नाही. त्यासाठीही त्यानं काही गुंड्या केल्याची विद्यापीठात पोरांमध्ये चर्चा आहे.
तो पुण्यात येऊन एमपीएससी, युपीएससी की असंच काहीतरी करतोय असं म्हणतात. पुण्यात राहायला जागा हवी, म्हणून होस्टेल मिळवण्यासाठी त्यानं कोर्सला ऍडमिशन घेतलीय. त्याच्याकडे गावाकडं बुलेट आहे; पण त्याला आता पल्सर हवीय.
त्याचा बाप राज्यात कुठंतरी मोठ्या पोस्टवर आहे. त्याला वाटतंय, पोरगं लवकरच तहसीलदार तरी होईल. पोरगं दररोज अभ्यासाच्या नावाखाली एका अभ्यासिकेत जातं. तिथं त्याला एक छावी मिळालीय आणि शिष्य जमवण्याचा छंद असणारा एक मास्तरही गुरू म्हणून मिळालाय.
ती म्हणजे मुक्ता ऊर्फ मॅकी. तीही अशाच काही कॉम्पिटिटिव्ह एक्‍झामसाठी आलीय. ग्रॅज्युएशन होऊन बरेच दिवस झाल्यानं घरचे आता लग्नाच्या मागे लागलेत. बी.एस्सी. झालंय म्हणे तिचं. पुढे एम.एस्सी. करायचं सोडून ती हे करतीय. लग्न टाळण्यासाठी तिचा हा सो कॉल्ड कॉम्पिटिटिव्ह एक्‍झामचा उद्योग सुरू आहे. मध्ये मध्ये तिला टेक्‍निकल रायटिंग आणि असलेच कुठले तरी डिप्लोमे करायचे होते. तिचा बाप बागायतदार आहे.
ती आणि तो आणि अजून काही जण दररोज विद्यापीठातल्या किंवा फर्ग्युसन रोडवरच्या एका फेमस कॅंटिनमध्ये भेटतात. ती असूनही पक्‍या कॅंटीनमध्ये येणाऱ्या दुसऱ्या मुलींकडे बघतो आणि मनातल्या मनात जळतो. मग तीही जीन-टी शर्ट टाकून टाईट राहायचा प्रयत्न करते.
ते सगळेच तिथं येणाऱ्या गोऱ्या आणि अर्थातच घाऱ्यांकडे तास न्‌ तास बघत बघत दिवस घालवतात. मधून मधून दांडियासारख्या कार्यक्रमांनाही ते जातात. पबमध्ये जाण्याचाही ते विचार करतात. त्यांच्या वर्गात असणाऱ्या शर्मा वर्मांच्या वाढदिवसालाही ते आवर्जून जातात. त्यांना फ्रेशर्स पार्ट्या तर खासच आवडतात.
त्यांचा तो मास्तर दररोज पोरांना जमवून त्यांना काही बाही सांगत वेळ घालवतो. जुन्या राजकीय संघटनांच्या आठवणी सांगतो. पोरांनाही थोडं ज्ञान(?) मिळाल्यासारखं वाटतं. पक्‍याचे त्याच्यासारखेच अजून काही मित्र आहेत. त्यांचेही बाप असेच काही शाळा मास्तर, गटविकास अधिकारी किंवा असेच काही तरी आहेत. आणि त्यांच्याही अशाच काही तरी स्टोऱ्या आहेत.