Monday, November 5, 2007

पक्‍या आणि मॅकी

पंकजकुमार, पोरांचा पक्‍या आणि तिचा पकू. हा हा सॉरी पऽऽऽकू! पक्‍या दररोज कायम जीन आणि टी शर्टमध्येच असतो. तो कुठल्याशा कोर्समध्ये विद्यापीठात एमए करतोय. त्याला तिथं ऍडमिशन कशी मिळाली माहीत नाही. त्यासाठीही त्यानं काही गुंड्या केल्याची विद्यापीठात पोरांमध्ये चर्चा आहे.
तो पुण्यात येऊन एमपीएससी, युपीएससी की असंच काहीतरी करतोय असं म्हणतात. पुण्यात राहायला जागा हवी, म्हणून होस्टेल मिळवण्यासाठी त्यानं कोर्सला ऍडमिशन घेतलीय. त्याच्याकडे गावाकडं बुलेट आहे; पण त्याला आता पल्सर हवीय.
त्याचा बाप राज्यात कुठंतरी मोठ्या पोस्टवर आहे. त्याला वाटतंय, पोरगं लवकरच तहसीलदार तरी होईल. पोरगं दररोज अभ्यासाच्या नावाखाली एका अभ्यासिकेत जातं. तिथं त्याला एक छावी मिळालीय आणि शिष्य जमवण्याचा छंद असणारा एक मास्तरही गुरू म्हणून मिळालाय.
ती म्हणजे मुक्ता ऊर्फ मॅकी. तीही अशाच काही कॉम्पिटिटिव्ह एक्‍झामसाठी आलीय. ग्रॅज्युएशन होऊन बरेच दिवस झाल्यानं घरचे आता लग्नाच्या मागे लागलेत. बी.एस्सी. झालंय म्हणे तिचं. पुढे एम.एस्सी. करायचं सोडून ती हे करतीय. लग्न टाळण्यासाठी तिचा हा सो कॉल्ड कॉम्पिटिटिव्ह एक्‍झामचा उद्योग सुरू आहे. मध्ये मध्ये तिला टेक्‍निकल रायटिंग आणि असलेच कुठले तरी डिप्लोमे करायचे होते. तिचा बाप बागायतदार आहे.
ती आणि तो आणि अजून काही जण दररोज विद्यापीठातल्या किंवा फर्ग्युसन रोडवरच्या एका फेमस कॅंटिनमध्ये भेटतात. ती असूनही पक्‍या कॅंटीनमध्ये येणाऱ्या दुसऱ्या मुलींकडे बघतो आणि मनातल्या मनात जळतो. मग तीही जीन-टी शर्ट टाकून टाईट राहायचा प्रयत्न करते.
ते सगळेच तिथं येणाऱ्या गोऱ्या आणि अर्थातच घाऱ्यांकडे तास न्‌ तास बघत बघत दिवस घालवतात. मधून मधून दांडियासारख्या कार्यक्रमांनाही ते जातात. पबमध्ये जाण्याचाही ते विचार करतात. त्यांच्या वर्गात असणाऱ्या शर्मा वर्मांच्या वाढदिवसालाही ते आवर्जून जातात. त्यांना फ्रेशर्स पार्ट्या तर खासच आवडतात.
त्यांचा तो मास्तर दररोज पोरांना जमवून त्यांना काही बाही सांगत वेळ घालवतो. जुन्या राजकीय संघटनांच्या आठवणी सांगतो. पोरांनाही थोडं ज्ञान(?) मिळाल्यासारखं वाटतं. पक्‍याचे त्याच्यासारखेच अजून काही मित्र आहेत. त्यांचेही बाप असेच काही शाळा मास्तर, गटविकास अधिकारी किंवा असेच काही तरी आहेत. आणि त्यांच्याही अशाच काही तरी स्टोऱ्या आहेत.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

स्टोऱ्या झक्कास