Tuesday, January 1, 2008

हॅपी न्यू इयर

पियू, अथर्व, गंधाली आणि आर्यन हा नॉक आऊट ग्रुप. त्यांची कॉलेजपासूनची दोस्ती. आता नुकतेच कुठे ते जॉबला लागले होते.
या वर्षी थर्टी फर्स्ट जरा हटके करायचं त्यांनी ठरवलं होतं. "हटके म्हणजे काय?', असा खवचट प्रश्‍न मध्येच गंधालीनं विचारलाच होता. तेव्हा सर्वानुमते थर्टी फर्स्ट हा "इको फ्रेंडली' करायचा ठरला. "इको फ्रेंडली' म्हणजे काय, असाही प्रश्‍न पुन्हा आलाच!
घरापासून दूर नेहमीसारखंच एखाद्या शेतात जाऊन पार्टी करायची. पार्टी करताना कोणाला त्रास होणार नाही, असं बघायचं. कचरा, गोंधळ, बाटल्या आपल्या आपण उचलून न्यायच्या, ही त्यांची "इको फ्रेंडली'ची कल्पना.
इको फ्रेंडली कशाला, कुठल्यातरी हॉटेलात जाऊ. डिजे-बिजेबरोबर मस्त गाऊ नाचू, असं अथर्वचं म्हणणं. पण आर्यन म्हणाला, ""आपण आणि सगळे दर वर्षी तेच करतात. या वेळी काही तरी वेगळं करू.'' त्याला पियूनं पाठिंबा दिला.
मित्र, कॉलनीतले मित्र आणि मित्रांच्या मित्रांना इन्व्हीटेशन्स गेली. गंधालीच्या ओळखीच्या काकांच्या फार्म हाऊसवर संध्याकाळी सगळी गॅंग पोचली. सेटबिट लावल्यानंतर म्युझिक सुरू झालं. हे स्टार्टर झाल्यानंतर अंताक्षरी, ऍक्‍टिंगची हूनर वगैरे झाल्यानंतर मग झूम बराबर झूमच्या तालात काऊंट डाऊन झाला. आणि सगळ्यांनी सगळ्यांना हॅपी न्यू इयर केलं.
लगेच सगळ्यांनी एकमेकांना नव्या वर्षातील आपले संकल्प सांगायचं ठरलं. कोणी म्हणालं, की मी या वर्षी ऑर्कुटला रामराम करणार. कोणी म्हणालं, की मी नवा जॉब शोधणार. गंधाली म्हणाली, ""मी या वर्षी सिरीयस व्हायचं ठरवलंय.'' अथर्व म्हणाला, ""मी इंग्लीशवर भर देणार,'' पियू म्हणाली, ""मी या वर्षी रिलेशनशिपचा सिरियसली शोध घेणार आहे.'' आर्यन म्हणाला, ""मी सोशल वर्क करायचं ठरवलंय.
''प्रत्येकानं प्रत्येकाला त्याच्या रिझोल्यूशनमध्ये मदत करायची ठरवली. आर्यनची सोशल वर्कची कल्पना नेमकी काय, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. तो म्हणाला, ""त्यासाठी आपण एक महिन्याने भेटू, टिल देन हॅपी न्यू इयर.''