Tuesday, December 18, 2007

हे आणि तेही

बऱ्याच दिवसांनी संध्याकाळी आम्ही युनिव्हर्सिटीत अड्डा जमवायचं ठरवलं.
पश्‍या, मी आणि जोश्‍या. थंडी, चहा आणि गप्पा. व्वा क्‍या बात है!
जोश्‍या फोनवर जोशात होता. ""मला फारच महत्त्वाचं बोलायचंय. डॉट वेळेवर या.''
अपेक्षेप्रमाणे मी आणि जोश्‍या वेळेवर हजर. पश्‍याची गाडी दिसत होती; पण पश्‍या गायब. थोड्या वेळानं स्वारी भकाभक फुकत निवांतपणे टपकली.
जोश्‍या म्हणाला, ""मला समजत नाही यार, काय करू? मला चित्रा पण आवडते आणि अश्‍विनी पण चांगली वाटते.''
मी- त्या दोघींपैकी जास्त कोणती आवडते?
जोश्‍या- टिपिकल प्रश्‍न विचारू नको.
मी- मग विचारून टाक, जिथं जमेल तिथं जमेल.
जोश्‍या - म्हणजे काय. ते इतकं सोप्पंय का! आणि तुम्ही या गोष्टी इतक्‍या कॅज्युअली नका घेऊ, बरं का!मी सिरीयसली बोलतोय. मला समजत नाहीये.
मी - अजून काही प्रश्‍न आहेत का, तुलना करण्यासाठी!
जोश्‍या - नाहीरे जाती-बितीचा प्रश्‍न नाही. प्रश्‍न अश्‍विनीसारख्या प्रचंड बुद्धिमान मुलीनं माझ्याबरोबर का यावं, हा आहे.
इतका वेळ शांतपणे फुकणारा पश्‍या उसळी मारून म्हणाला, ""माझं काही ऐकूनच घेणार आहात का?''"
"हा बोल'' ""बोल बोल.''
पश्‍या - हे बघा, माझ्या होणाऱ्या बायकोनं मंगळसूत्र घातलंच पाहिजे. माझं नाव लावलं पाहिजे. आणि ती माझ्या जातीचीच पाहिजे.
जोश्‍या - आणि अजून काय काय केलं पाहिजे? कुंकू, घुंगट वगैरे..वगैरे?
पश्‍याच्या बोलण्यावर जोश्‍या चांगलाच उखडला होता.
मी थोडी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला.
पश्‍या - नाही मी म्हणतो की माझ्या म्हणण्यात काय चूक काय आहे? मी असं बोललो की लोक खवळतात.
मी - नाही चूक काहीच नाही. फक्त प्रश्‍न असा आहे, की तुला अशी कोणी मिळालीय का? आणि तुला खरं सांगू, मला आता त्या जुन्या आशा काळे चित्रपटांची आठवण येतीये.
जोश्‍या - आणि एक कर तिला आमचीही ओळख करून दे. काय राव, आम्ही काय बोलतो आणि तू काय बोलतो!
दोघांमध्ये समन्वय साधण्यासाठी मी पुन्हा चहा मागवला आणि चर्चेचा विषय हळूच बदलला.